
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
विधानसभा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १३ ते ३० जुलै या कालावधीत सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत.
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्यासाठी राज्यभर विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षकांना नियमित अध्यापनासोबतच बीएलओची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता यावी, तसेच मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शालेय कामकाज आणि मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया या दोन्ही कामांचा समतोल राखण्यास मदत होणार असून, संबंधित कालावधीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु