
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। करमाळा तालुक्यातील महत्त्वाकांक्षी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, लवकरच सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली. मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
जलसंपदामंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार नारायण पाटील तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आमदार पाटील यांनी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासंदर्भातील प्रलंबित बाबी मांडल्या.
नियामक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली असली, तरी सर्वेक्षणाच्या कामाचा समावेश चतुर्थ 'सुप्रमा'मध्ये करण्यात आल्याने प्रकल्पाला विलंब होणार असल्याची बाब आमदार पाटील यांनी जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी सर्वेक्षणाचा समावेश तृतीय 'सुप्रमा'मध्ये करून तातडीने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली.
या मागणीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावाची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्वेक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ६५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. या निर्णयाचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड