
पुणे, 11 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या भेटीची आस मनात बाळगून पंढरपूरकडे प्रस्थान केलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी पुण्यात दाखल झाला. भवानी पेठेतील श्री विठोबा मंदिरात पालखी मुक्कामाला आल्यानंतर परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'माउली, माउली'च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी पहाटेपासूनच हजारो वारकरी आणि भाविकांनी रांगा लावत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेत विठ्ठलनामाचा गजर केला.
पहाटे साडेपाच वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर भाविकांचा दर्शनासाठी अखंड ओघ कायम होता.
प्रत्येक दिंडीत पहाटे काकड आरती, दिवसभर हरिनाम संकीर्तन, भजन, अभंग आणि सायंकाळी हरिपाठाचे कार्यक्रम रंगले. वारकरी नामस्मरण, भजन-कीर्तन आणि भारुडात तल्लीन झाले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला.
पालखी मुक्कामामुळे भवानी पेठ परिसराला भक्तीच्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. धार्मिक साहित्य, पूजासाहित्य आणि पारंपरिक वस्तूंच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. पालखीसोबत आलेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांनी शहरातील मंदिरे, मंगल कार्यालये, शाळा आणि विविध मैदानांमध्ये मुक्काम केला.
आळंदी-देहू ते पुणे आणि पुढे सासवड असा लांब पायी प्रवास केल्यानंतर अनेक वारकऱ्यांनी दुपारच्या वेळेत विश्रांती घेतली. सायंकाळी काही वारकऱ्यांनी पुण्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देत शहरदर्शनाचाही आनंद लुटला. पालखी मुक्कामामुळे संपूर्ण पुणे शहर विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेले असून सर्वत्र हरिनामाचा अखंड गजर घुमत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु