
डोंबिवली, 11 जुलै (हिं.स.) । येथील कवयित्री सौ. उज्ज्वला लुकतुके यांच्या 'आदी सनातन' कथासंग्रहाचे प्रकाशन मातब्बर कवी आणि कथाकार किरण येले यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री. येले म्हणाले, समकालीन विषयांना लुकतुके यांनी समर्थपणे वाचा फोडली असून त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. प्रमुख पाहुण्या आणि पुस्तकाच्या प्रकाशिका प्रज्ञा जांभेकर म्हणाल्या की, उज्ज्वला यांच्या कथेचा शेवट अनपेक्षित असतो, पण तो जुळून आलेला असतो. विशेष अतिथी ज्येष्ठ लेखक माधव जोशी यांनी पुस्तकाला शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीतील पुस्तक चळवळीचे प्रणेते पुंडलिक पै यांनी वाचन परंपरेविषयी बोलून पुस्तक विकत घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाात बारा वर्षीय ओजस गोडबोले याचे लयतालावर हुकमत असलेले तबलावादन, भानुदास देशपांडे आणि कल्पिता खरे यांचे दमदार गायन, पुस्तकातील कथांचे सानिका गोडसे आणि अनुराधा फाटक यांचे प्रभावी सादरीकरण असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम कलेचा संगम होता. डोंबिवलीकरांनी त्याचा उत्तम आस्वाद घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी