सोलापूर बार असोसिएशन निवडणूक रंगणार; अध्यक्षपदासाठी तिरंगी लढतीची शक्यता
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। सोलापूर बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर ५ ऑगस्ट रोजी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत. सोलापूर जिल्हा व सत्र
bar


सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)। सोलापूर बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर ५ ऑगस्ट रोजी नव्याने निवडून आलेले पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या वकील सभासदांना २० जुलैपर्यंत वर्गणी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी आणि माघारीची प्रक्रिया नियमानुसार पार पडणार आहे.

सोलापूर बार असोसिएशनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, माजी अध्यक्ष ॲड. लक्ष्मण मारडकर, ॲड. एच. एम. अंकलगी, ॲड. उमेश मराठे, ॲड. संजीव सदाफुले, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. अशोक जालादी यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. यावेळी निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. संतोष पाटील, ॲड. विक्रांत फताटे आणि ॲड. राजेंद्र फताटे यांच्या नावांची चर्चा आहे. तर उपाध्यक्षपदासाठी ॲड. विनोदकुमार जमादार आणि ॲड. परमानंद जवळकोटे, तसेच सचिवपदासाठी ॲड. मंजुनाथ कक्कळमेली आणि ॲड. जयप्रकाश भंडारे हे इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय इतर काही वकिलांच्या नावांचीही चाचपणी सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande