
सोलापूर, 11 जुलै (हिं.स.) वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भीमा नदीकाठच्या गावांना पुरेसा वीज व पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या महाराष्ट्रातील गावांना पाणी उपसा करण्यासाठी केवळ दोन तासांचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपसणे कठीण होत असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
याउलट, भीमा नदीच्या कर्नाटक हद्दीतील गावांना आठ तास वीजपुरवठा मिळत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या असमानतेमुळे महाराष्ट्रातील सीमाभागातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने सीमाभागातील गावांना पुरेसा वीज व पाणीपुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे सीमाभागातील वीज व पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड