एस. पी. कॉलेज होर्डिंग करारप्रकरणी कारवाई; शिक्षण प्रसारक मंडळाला नोटीस
पुणे, 11 जुलै (हिं.स.)। पुण्यातील एस. पी. कॉलेज परिसरातील होर्डिंग करारातील कथित अनियमिततेप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच पुणे महापालिकेने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल
pmc


पुणे, 11 जुलै (हिं.स.)।

पुण्यातील एस. पी. कॉलेज परिसरातील होर्डिंग करारातील कथित अनियमिततेप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच पुणे महापालिकेने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण प्रसारक मंडळीने टिळक रोडवरील एस. पी. कॉलेज परिसरात उभारण्यात आलेल्या सहा जाहिरात फलकांसाठी २०२१ मध्ये सिद्धिविनायक ॲडव्हर्टायझिंग कंपनीसोबत ७२ महिन्यांचा करार केला होता. मात्र, हा करार कायद्यानुसार नोंदणी करण्याऐवजी केवळ नोटराइज करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला होता.

या संदर्भात धाडवे यांनी नोंदणी व मुद्रांक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि पुणे महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने संबंधित संस्थेला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे.

दरम्यान, नोंदणी व मुद्रांक विभागानेही शासनाच्या महसुलाची संभाव्य फसवणूक झाल्याच्या मुद्द्यावर संस्थेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. नोटिशीत सात दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येणाऱ्या व्यावसायिक करारांच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande