
पुणे, 11 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या राजकीय चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, आमची आणि काँग्रेसची विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील कथित नाराजीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. पक्षात कोणीही नाराज नाही. आणि कोणी नाराज असेल, तरी तो बाहेर येऊन बोलणार नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यातून पक्षात सर्व काही सुरळीत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या ताज्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना त्यांनी स्पष्टपणे पूर्णविराम दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु