
लातूर, 12 जुलै, (हिं.स.)। सरकारी रकमेचा अपहार करून तब्बल २८ वर्षे फरार असलेल्या एका आरोपीला लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेला हुलकावणी देणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी संजय केशवराव देशपांडे (वय ६२ वर्षे, रा. हलगरा, ता. निलंगा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस स्टेशन गांधी चौक येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०/१९९८ नुसार, हलगरा येथील शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना आरोपीने सरकारी रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप होता. १९९८ च्या दरम्यान डाकघरातील बचत खातेदारांच्या ठेवींमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला होता. यात एल. डी. सूर्यवंशी यांच्या खात्यातील २,६८३ रुपये आणि के. एच. शिंगारे यांच्या खात्यातील १४,६७८ रुपये, अशा एकूण १७,३६१ रुपयांचा अपहार बनावट कागदपत्रे व स्वाक्षऱ्या करून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काही काळ फरार झाला होता. न्यायालयाने अटक वॉरंट व जाहीरनामा काढूनही तो मिळून येत नव्हता.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना आरोपी औसा रोड परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला गांधी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, जिथून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले व पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis