
नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। पुढील आठवड्यात प्राथमिक शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी तीन नवे आयपीओ खुले होणार असून त्यामध्ये एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड, मिलवर्क्स टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि अल्पाइन टेक्सवर्ल्ड लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एसबीआय फंड्स मॅनेजमेंट आणि अल्पाइन टेक्सवर्ल्ड यांचे आयपीओ मेनबोर्ड श्रेणीतील आहेत, तर मिलवर्क्स टेक्नोलॉजीजचा आयपीओ एसएमई विभागातील आहे. १४ जुलैपासून हे तिन्ही आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार असून १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे बाजारातील नव्या संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष या तीन सार्वजनिक इश्यूंकडे लागले आहे.
एसबीआय म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन करणाऱ्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचा सुमारे ११,६९२.९१ कोटी रुपयांचा आयपीओ हा या आठवड्यातील सर्वात मोठा सार्वजनिक इश्यू ठरणार आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर ५४५ ते ५७४ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये २६ शेअर्सचा समावेश आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान २६ शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा सध्या ८८ रुपयांचा जीएमपी (ग्रे मार्केट प्रीमियम) असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लिस्टिंगपर्यंत जीएमपीमध्ये चढ-उतार होऊ शकतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
मिलवर्क्स टेक्नोलॉजीज लिमिटेडचा एसएमई आयपीओ ४८.४४ लाख नव्या इक्विटी शेअर्सचा असून त्याचा एकूण आकार १६०.३४ कोटी रुपये आहे. या इश्यूतून उभारण्यात येणारा निधी कंपनी प्लांट आणि मशिनरी खरेदी, कार्यकारी भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट खर्चासाठी वापरणार आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर ३१५ ते ३३१ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये ४०० शेअर्स आहेत. ग्रे मार्केटमध्ये या आयपीओचा जीएमपी तब्बल ३९० रुपये असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
अल्पाइन टेक्सवर्ल्ड लिमिटेडचा १२६.२५ कोटी रुपयांचा सार्वजनिक इश्यूदेखील १४ ते १६ जुलैदरम्यान खुला राहणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीकडून १.२० कोटी नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. या आयपीओसाठी प्रति शेअर १०० ते १०५ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये १४२ शेअर्सचा समावेश आहे. या आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या केवळ २ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिन्ही आयपीओंपैकी मिलवर्क्स टेक्नोलॉजीजचा जीएमपी सर्वाधिक, त्यानंतर एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा, तर अल्पाइन टेक्सवर्ल्डचा सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे. मात्र, जीएमपी हा अधिकृत निर्देशांक नसून त्यामध्ये सतत बदल होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसाय, जोखीम आणि मूल्यांकन यांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेणे तज्ज्ञांच्या मते अधिक योग्य ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule