
नाशिक, 13 जुलै (हिं.स.) :भावली डॅम-वॉटरफॉल ते मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात एका कुटुंबावर ७ ते ८ अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा तसेच मोबाईल आणि सोन्याची चैन लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात सौ. पुनम किरण भागवत (वय ४४, रा. नाशिकरोड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सपोउनि रमेश टोपले यांनी माहिती दिली.फिर्यादीनुसार, . १२ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता पुनम भागवत या पती किरण भागवत, मुलांसह आणि इतर नातेवाईकांसोबत भावली डॅमजवळील धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे ६ वाजता परतत असताना धबधब्याजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्टी वाजवली. याचा जाब किरण भागवत यांनी विचारल्यानंतर तेथे उपस्थित ७ ते ८ स्थानिक तरुणांनी त्यांच्याशी दमदाटी व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर कुटुंबीय नाशिकच्या दिशेने निघाले असता पांढऱ्या रंगाची मारुती बलेनो कार (एमएच-४६ बीई-३७२१) आणि काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील आरोपींनी त्यांच्या टाटा सफारी वाहनाचा पाठलाग करून ते अडवले. आरोपींनी लाकडी बांबू, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप आहे.यावेळी कारची काच फोडून पुनम भागवत यांचा विनयभंग करण्यात आला तसेच त्यांचा सॅमसंग एस-२४ अल्ट्रा मोबाईल हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच किरण भागवत यांच्या गळ्यातील सुमारे २ तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर घोटी टोलनाका परिसरात पुन्हा वाहन अडवून किरण भागवत यांना कारमधून बाहेर ओढत बेसबॉल स्टिकने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मात्र त्यांनी हा वार चुकवला.या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फिर्यादीने मोबाईलमध्ये जतन करून पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केले आहेत. अंबड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV