
जळगाव, 13 जुलै (हिं.स.)जागतिक पातळीवरील घडामोडींचा थेट फटका सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजाराला बसला आहे. गेल्या सात दिवसांत सोने ४ हजारांनी तर चांदी तब्बल १३ हजार रुपयांची घसरण झाली असून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहेजळगाव बाजारात आज सोमवारी सोन्याचे दर १ लाख ४२ हजार रुपये प्रति तोळा तर चांदी २ लाख २२ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे.
बाजारपेठेतील या मोठ्या पडझडीमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही थक्क झाले आहेत.सामान्यतः आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास सोन्याचे भाव वाढतात. मात्र, सध्या अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे भाव वधारले असून महागाई वाढण्याची भीती आहे. परिणामी अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने, गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे, ज्याचा थेट परिणाम दरातील घसरणीत झाला आहे जळगावमधील आघाडीच्या सोने व्यापाऱ्यांनी बाजाराच्या आगामी स्थितीबद्दल महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, जोपर्यंत युद्ध सुरू राहील, तोपर्यंत घसरण कायम राहणार आहे. अमेरिका आणि इराणमधील वाद जोपर्यंत मिटत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या किमती दबावाखाली राहतील आणि दरांमध्ये आणखी घट किंवा मंदी पाहायला मिळू शकते. दोन्ही देशांमधील युद्ध संपून जसेही आंतरराष्ट्रीय बाजारात शांततेचे वातावरण तयार होईल, तसे सोन्याचे दर पुन्हा एकदा रॉकेटच्या गतीने वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात झालेली ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर