
लातूर, 13 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सराईत वीजतार चोरांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीच्या वीजतारा, मोटारसायकल आणि मालवाहू वाहनासह सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींनी २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश गोपाळ देंडे (रा. किल्लारीवाडी, ता. औसा) आणि अविनाश अजाप्पा कोमारे (रा. शिवनगर, ता. निलंगा) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्लारी गावात संशयास्पद हालचाल करणाऱ्या आकाश देंडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महावितरणच्या विद्युत खांबावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार अविनाश कोमारे यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही गुन्ह्यातील सहभाग मान्य केला.आरोपींकडून २ लाख ४८ हजार रुपयांच्या चोरीच्या वीजतारा, चोरीसाठी वापरलेली ५० हजार रुपयांची मोटारसायकल आणि अडीच लाख रुपयांचा मालवाहू छोटा हत्ती असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वीज अधिनियमांतर्गत १० गुन्ह्यांसह ११ अदखलपात्र मालमत्ता विषयक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून, अधिक तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली किल्लारी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis