
लातूर, 13 जुलै (हिं.स.)।मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर व डीसी केबल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने लातूर जिल्ह्यातील सहा आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन अशा एकूण नऊ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी विशेष पथकाला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीची माहिती मिळाली. पथकाने संशयित विकास विलास जाधव (वय ४०, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेतले. त्याच्या पिशवीची झडती घेतली असता २ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली.
चौकशीत ही रक्कम चोरी केलेल्या कॉपर वायर व डीसी केबल विक्रीतून मिळाल्याची कबुली आरोपीने दिली. तसेच सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या साथीने ओमनी कार व रिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने, गोदामे व इतर ठिकाणांहून कॉपर वायर व डीसी केबल चोरी केल्याची माहिती त्याने दिली.
तपासात आरोपीने लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्याचे तीन, चाकूर पोलीस ठाण्याचे दोन आणि गांधी चौक पोलीस ठाण्याचा एक अशा सहा गुन्ह्यांतील सहभागाची कबुली दिली. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग आणि शिराढोण पोलीस ठाण्यांत दाखल प्रत्येकी एका गुन्ह्याचाही उलगडा झाला आहे.
जप्त करण्यात आलेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड ही चोरीतील कॉपर वायर व केबल विक्रीतून मिळाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून चोरीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.
आरोपीला औसा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५०६/२०२५ मध्ये मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास औसा पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis