
जळगाव , 13 जुलै (हिं.स.) स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका ४२ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३ जून ते १० जुलैदरम्यान घडलेल्या या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल टिकमदास पोपटानी (वय ४२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांना ३ जून रोजी व्हॉट्सऍपवर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचा संदेश आला होता. त्यानंतर एका लिंकद्वारे ऍप डाउनलोड करण्यास सांगत त्यांना व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. भामट्यांनी विविध माहिती मागितल्यानंतर पोपटानी यांनी विश्वास ठेवून ती उपलब्ध करून दिली.यानंतर २४ जून रोजी त्यांनी सुरुवातीला १ लाख २५ हजार रुपये गुंतवले. ऍपमध्ये त्यांना ८० हजार रुपयांचा नफा झाल्याचे दिसल्याने त्यांचा विश्वास वाढला. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी एकूण ९ लाख ३५ हजार रुपये गुंतवले.काही दिवसांनी पोपटानी यांनी ऍपमधून १० लाख रुपये विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम खात्यात जमा झाली नाही. याबाबत त्यांनी व्हॉट्सऍप ग्रुपमधील सदस्यांशी संपर्क साधला असता, “तुम्हाला आयपीओ लागला असून रक्कम काढण्यासाठी आणखी ३२ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील,” असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर