‘शालार्थ आयडी घोटाळा : मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीलेला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक, 13 जुलै (हिं.स.) : बहुचर्चित 160 कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीले याला नाशिकरोड न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बागल यांच्या न्यायालयात व
‘शालार्थ आयडी घोटाळा : मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीलेला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी


नाशिक, 13 जुलै (हिं.स.) : बहुचर्चित 160 कोटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीले याला नाशिकरोड न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बागल यांच्या न्यायालयात वाडीलेला हजर करण्यात आले होते.

सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी पहाटे धुळ्यातून प्रशांत वाडीले याला अटक केली. या प्रकरणात अटक झालेला तो चौथा आरोपी आहे.

शालार्थ घोटाळ्याचा तपास सुरू झाल्यानंतर वाडीले पोलिसांना चकवा देत होता. मात्र, शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एसआयटीच्या पथकाने धुळे येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकून झोपेतूनच त्याला ताब्यात घेतले.

841 शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह

तपासात शाळांना मान्यता नसतानाही जुन्या सरकारी आदेशांचा गैरवापर करून शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात फेरफार केल्याचा आरोप समोर आला आहे. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील 841 शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने दाखवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट शालार्थ आदेश तयार करून प्रणालीमध्ये नोंदी करण्यात आल्या आणि शासनाकडून सुमारे 160 कोटी रुपयांचे वेतन व थकबाकी लाटल्याचा आरोप आहे.

54 शिक्षण संस्थांशी संबंध

तपासात प्रशांत वाडीलेच्या नावावर 54 शिक्षण संस्था आढळून आल्याचे समोर आले असून, तो 65 आश्रमशाळांचा कारभार पाहत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. साक्री आणि शिंदखेडा येथे त्याच्या दोन विनाअनुदानित शाळा असल्याचेही तपासात आढळले आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळा व संस्थांचे जाळे उभे करून शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

या महाघोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयात तब्बल 11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. 12 मार्च 2026 रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य सूत्रधार प्रशांत वाडीले पोलिसांच्या ताब्यात आल्याने शिक्षण विभागातील आणखी काही अधिकारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासातून घोटाळ्याची आणखी मोठी व्याप्ती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande