
रायगड, 13 जुलै (हिं.स.)।महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्या वतीने जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पंच चाचणी परीक्षेत रायगड जिल्ह्यातील अकरा पंचांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत मुख्य परीक्षेस पात्रता मिळवली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या पुढाकारातून पंचांच्या गुणवत्तावाढीसाठी जून २०२६ पासून १०५ दिवसांचे विशेष मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कार्यशाळांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे हे शिबिर ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून पंचांना क्रिकेटच्या नियमांचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.
या शिबिरात क्रिकेट नियमांचे तज्ज्ञ नयन कट्टा यांच्यासह बीसीसीआयचे पंच हर्षद रावले आणि रुपेश खडगी तसेच एमसीए, मुंबईचे पंच राजन कसबे मार्गदर्शन करत आहेत. शिबिराच्या नियोजनाची व आयोजनाची जबाबदारी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा एमसीएचे पंच ॲड. पंकज पंडित आणि प्रशांत माळी यांनी सांभाळली आहे.
मुख्य परीक्षेस पात्र ठरलेले पंच पुढीलप्रमाणे आहेत : अरुण ठाकूर (उरण), राहुल पाटील (उरण), रविंद्र म्हात्रे (उरण), ॲड. देवेंद्र मिश्रा, श्रीकांत पाटील (पेण), संकेश ढोले, मंगेश वार्डे (अलिबाग), सूरज देशमुख (रोहा), प्रवीण देशमुख (खालापूर), प्रणव सामंत आणि यश संकपाल (पनवेल).
या यशाबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी सर्व यशस्वी पंचांचे अभिनंदन केले असून, मुख्य परीक्षेतही ते उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. क्रिकेट पंचगिरीच्या क्षेत्रात रायगडमधील नव्या पिढीला प्रोत्साहन मिळत असून, या यशामुळे जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृतीला आणखी बळ मिळणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)