प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडली
नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.)चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि त्यांचे मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंग, यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी व्यवस्थापन आणि फ्लेमिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. फ्लेमिं
स्टीफन फ्लेमिंग


नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.)चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि त्यांचे मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंग, यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझी व्यवस्थापन आणि फ्लेमिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. फ्लेमिंग यांनी दीर्घकाळ CSK चे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते, परंतु २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या काही महिन्यांतच त्यांनी संघ सोडण्याचा निर्णय घेतला.

स्टीफन फ्लेमिंग २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. गेल्या १७ वर्षांपासून सीएसके आणि फ्लेमिंग यांचे नाते घट्ट राहिले आहे आणि फ्रँचायझीने अनेक यश मिळवले आहेत. फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच आयपीएल ट्रॉफी आणि दोनदा चॅम्पियन्स लीग टी२० चे विजेतेपद पटकावले. इतकेच नाही, तर सीएसकेने विक्रमी १२ वेळा प्लेऑफ आणि १० वेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.

सीएसकेच्या मालक रूपा गुरुनाथ म्हणाल्या, या फ्रँचायझीच्या संपूर्ण प्रवासात स्टीफन फ्लेमिंग आमच्या कोचिंग युनिटचा कणा राहिले आहेत. जवळपास दोन दशके, त्यांनी आमची ओळख, दूरदृष्टी आणि उत्कृष्टता घडवण्यात मदत केली. सुपर किंग्स फ्रँचायझीच्या वतीने, आम्ही त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आणि नेतृत्वाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. जरी मैदानातील आमचा प्रवास आता संपत आला असला तरी, ते संघाच्या वारशाचा एक अविभाज्य भाग म्हणून कायम राहतील.

सीएसकेमधून बाहेर पडल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, क्रीडाविश्वातील १८ वर्षे म्हणजे एक आयुष्यच आहे, आणि मी केवळ कृतज्ञतेच्या भावनेने येथून निघत आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबतचा माझा काळ हा माझ्या कोचिंग कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रवास राहिला आहे. आम्ही एकत्र मिळून जे काही मिळवले आहे, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही एकत्र अविस्मरणीय विजय साजरे केले, कठीण प्रसंगांना तोंड दिले आणि अशा आठवणी निर्माण केल्या ज्या माझ्यासोबत कायम राहतील. सीएसके नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि येत्या काही वर्षांतही मी संघाला प्रोत्साहन देत राहीन.

सीएसकेने शेवटचे आयपीएल २०२३ मध्ये जिंकले होते. पण तेव्हापासून संघाची कामगिरी खराब राहिली आहे. सीएसके सलग तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाही. २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये संघाचा प्रवास गट फेरीतच संपला. २०२४ मध्ये सीएसके पाचव्या स्थानावर राहिला, तर २०२५ मध्ये तो गुणतालिकेत तळाशी १० व्या स्थानावर राहिला. २०२६ च्या हंगामात संघ आठव्या स्थानावर राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande