
महाड, 13 जुलै (हिं.स.) : मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाचे शासकीय काम सुरू असताना बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिकेला धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाड नगरपालिका शाळा क्रमांक ४ मधील खोली क्रमांक २ येथे दासगाव येथील महिला शिक्षिका तहसीलदार महाड यांच्या आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाचे काम करीत होत्या.
यावेळी आरोपी तेथे आला आणि पत्नीचे नाव मतदार यादीत मॅपिंग झाले नसल्याच्या कारणावरून मोठ्याने वाद घातला. त्यानंतर आरोपीने लोकसेवक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षिकेच्या अंगावर धावून जात धमकी दिल्याचा तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, २२१, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)