
अलिबाग, 13 जुलै (हिं.स.) : तालुक्यातील कुरूळ येथील कोकण कासा व्हिला येथे केअरटेकरनेच विश्वासघात करत सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीपाद बिर्जे हे ११ जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास व्हिलावर आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर व्हिलामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये व्हिलाचा केअरटेकर एम. डी. महजर उर्फ साहील हा मौल्यवान वस्तू घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले.
चोरीस गेलेल्या ऐवजात ओला एस१ प्रो इलेक्ट्रिक दुचाकी (किंमत ८० हजार रुपये), डेल कंपनीचा लॅपटॉप (किंमत ३० हजार रुपये), तसेच ओप्पो मोबाईल व चार्जर (किंमत १५ हजार रुपये) यांचा समावेश असून एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.आरोपी सध्या फरार असून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तसेच आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)