
लातूर, 13 जुलै (हिं.स.)लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वाढवणा पोलीस ठाण्याच्या पथकाने तिर्रट नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दोन चारचाकी वाहने आणि चार दुचाकी असा एकूण २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे नळगीर शिवारातील एका शेतातील चिंचेच्या झाडाखाली काही व्यक्ती पैसे लावून बेकायदेशीरपणे तिर्रट जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाढवणा पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत नामदेव प्रल्हाद पवार (२५, रा. नळगीर तांडा), संजय काशीराम राठोड (५१, रा. धर्मा तांडा, गुत्ती, ता. जळकोट) आणि दगडोबा गोविंद गोतावळे (५२, रा. सोनावळा, ता. जळकोट) यांना अटक करण्यात आली.
तर रंजीत मरेपा मोटेवाड (रा. जळकोट), सुदर्शन देव मूलशंकर कापसे, दीपक सूर्यकांत गायकवाड, संतोष माधवराव बिजले आणि गणेश बालाजी पेदावाड (सर्व रा. नळगीर, ता. उदगीर) हे घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
छाप्यामध्ये तिर्रट जुगाराचे साहित्य, १५ हजार ५०० रुपये रोख, दोन चारचाकी वाहने (किंमत २० लाख ५० हजार रुपये) आणि चार दुचाकी (किंमत २ लाख ७० हजार रुपये) असा एकूण २३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२(अ) अंतर्गत आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मधुकर हालसे असून, गुन्हा पोलीस अंमलदार नागरगोजे यांनी नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार इकरम उजडे करीत आहेत.
लातूर जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis