
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
सोलापूर, 13 जुलै : उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराचा मुरूम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता. संबंधित ट्रकवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता तो सोडून देण्यासाठी मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सोमवारी दुपारी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजयकुमार माने यांना रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी विजयकुमार माने यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईनंतर तहसील कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, एसीबीकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड