
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)सोलापूर शहरातील साखर पेठ येथील मुजम्मील हबीब कोथिंबीरे (वय २९) आणि रेल्वे स्थानकाजवळील काडादी चाळ परिसरातील नीलेश बसवराज बिळूर (वय २७) या दोघांना १४.७१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह सदर बझार पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे अमली पदार्थ, दोन हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथक हद्दीत गस्त घालत असताना सिद्धार्थ चौकातील पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. पोलिसांचे वाहन पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली.झडतीदरम्यान दोघांकडून एकूण १४.७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. याशिवाय त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी यापूर्वी पोलिसांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर नसल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सदर बझार पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत ड्रग्जचा पुरवठादार, वितरण साखळी आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड