
ढाका , 14 जुलै (हिं.स.)।सध्या बांग्लादेशमध्ये एक नवी चर्चा रंगली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच बांग्लादेशात परतू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या परतल्यास त्यांच्याशी कसा आणि कोणता व्यवहार केला जाईल, याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता बांग्लादेश सरकारमधील एका मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना बांग्लादेशात परतल्यास त्यांना तुरुंगात जावे लागेल.
तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री असलेल्या शमा ओबैद इस्लाम यांनी शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनाबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, “जर शेख हसीना यांनी आत्मसमर्पण केले, तर विद्यमान कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्यांना तुरुंगात जावे लागेल. कायदा आपले काम करेल.” शमा यांनी स्पष्ट केले की, शेख हसीना यांनी शरणागती पत्करल्यास सरकार पूर्णपणे कायदेशीर चौकटीत राहूनच पुढील पावले उचलेल.
ऑगस्ट २०२४ मध्ये बांग्लादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला होता. सरकार उलथवून टाकल्यानंतर त्या ढाक्यातून सुरक्षितपणे भारतात आल्या आणि तेव्हापासून त्या भारतातच वास्तव्यास आहेत.मात्र, अलीकडेच त्यांनी आपण लवकरच बांग्लादेशात परतणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यात शेख हसीना यांनी आपल्या पुनरागमनाबाबत मोठी घोषणा करत सांगितले की, त्या अवामी लीगच्या इतर निर्वासित नेत्यांसह डिसेंबरच्या सुमारास स्वेच्छेने बांग्लादेशात परतण्याचा विचार करत आहेत.
यावेळी त्या म्हणाल्या, “मी बांग्लादेशात परतल्यानंतर ते मला अटक करू शकतात, मला ठारही मारू शकतात. तरीही मला परत जायलाच हवे.” पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भीषण दडपशाहीला सामोरे जात आहेत. जर मृत्यू येणारच असेल, तर तो माझ्या मातृभूमीत यावा, जिथे माझे आई-वडील दफन आहेत आणि जिथे त्यांच्या रक्ताचा साक्षीदार असलेला इतिहास आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode