
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे आज सकाळी मोटारीने उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारीतील चौघे जण ठार, तर एक जण जखमी झाला.
आज सकाळी सात वाजता झालेल्या अपघातात गोव्याहून मुंबईला चाललेल्या क्रेटा मोटारीने (क्र. MH01CP8021) गाडीने उभ्या असलेल्या डंपरला (क्र. MH 05 EL 3877) पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती, की गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. एकाच कुटुंबातील दोन महिला आणि दोघा पुरुषांसह चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. यास्मिन इरफान कुरेशी (वय 54 वर्षे), पिझ्झा अनस कुरेशी (27 वर्षे), महम्मद इरफान कुरेशी (15 वर्षे) आणि मुस्तफा अल्फाज काफी (24 वर्षे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे सारे जण पटेल अपार्टमेंट (सीएचएस लिमिटेड, एफ/नं./डी/1601, 233/234, बेलासिस रोड, एम. ए. रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई 400008) येथे राहत होते. अपघातात अनस इरफान कुरेशी (31 वर्षे) हा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
मुख्य मार्गावरच अपघात झाल्याने काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी