एफबीआयच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत भारतीय गँगस्टर नीतीश कौशल
नवी दिल्ली , 15 जुलै (हिं.स.) : अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय (FBI) ने भारतीय नागरिक आणि जग्गू भगवानपुरिया टोळीशी संबंध असलेला गँगस्टर नीतीश कौशल याचा समावेश आपल्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. कौशलवर अमेरिकेत खून, अपहरण आणि अंमली
एफबीआयच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत भारतीय गँगस्टर नीतीश कौशल


नवी दिल्ली , 15 जुलै (हिं.स.) : अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय (FBI) ने भारतीय नागरिक आणि जग्गू भगवानपुरिया टोळीशी संबंध असलेला गँगस्टर नीतीश कौशल याचा समावेश आपल्या ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. कौशलवर अमेरिकेत खून, अपहरण आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागाचा आरोप आहे. तसेच, एफबीआय आता भगवानपुरिया गँगच्या कारवायांपर्यंत पोहोचत असल्याचे मानले जात आहे.

एफबीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक असलेल्या नीतीश कौशलने कथितपणे भगवानपुरिया संघटित गुन्हेगारी गटासाठी हिंसक कारवाया केल्या असून, त्यामध्ये अपहरण, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तपास यंत्रणेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “नीतीश कौशल हा एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली वाँटेड घोषित करण्यात आला आहे. ही संघटना खून, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली, शस्त्रास्त्रांची तस्करी, मनी लॉन्डरिंग आणि मानव तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.”

एफबीआयने पुढे म्हटले आहे की, कौशल हा शस्त्रधारी, अत्यंत धोकादायक आणि फरार होण्याची शक्यता असलेला आरोपी मानला जावा. तपास यंत्रणेने नागरिकांना आवाहन केले आहे की, नीतीश कौशलबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी जवळच्या एफबीआय कार्यालयाशी, अमेरिकन दूतावासाशी किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधावा.

एफबीआयच्या माहितीनुसार, जग्गू भगवानपुरिया संघटित गुन्हेगारी गटाची सुरुवात पंजाबमध्ये झाली होती, मात्र त्याच्या कारवाया अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसह इतर भागांमध्येही सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. एफबीआयने सांगितले की, लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट न्यायालयाने २५ जून रोजी नीतीश कौशलविरोधात फेडरल अटक वॉरंट जारी केले होते. त्याच्यावर रॅकेटिअर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स (RICO) कायद्यांतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एफबीआयची ही कारवाई ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ अंतर्गत करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, व्यापक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भारतात मुळे असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांविरोधात जागतिक स्तरावर वाढत्या समन्वयाने मोहीम राबवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande