पीयूष गोयल जगातील सर्वोत्तम वाटाघाटीकारांपैकी एक- ब्रिटिश व्यापार आयुक्त
नवी दिल्ली , 15 जुलै (हिं.स.)।भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियासाठी युनायटेड किंगडमचे व्यापार आयुक्त हरजिंदर कांग यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे कौतुक करत त्य
पीयूष गोयल जगातील सर्वोत्तम वाटाघाटीकारांपैकी एक- ब्रिटिश व्यापार आयुक्त


नवी दिल्ली , 15 जुलै (हिं.स.)।भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियासाठी युनायटेड किंगडमचे व्यापार आयुक्त हरजिंदर कांग यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे कौतुक करत त्यांना जगातील सर्वोत्तम वाटाघाटीकारांपैकी एक असे संबोधले आहे. कांग यांनी एकाच वेळी अनेक व्यापार करार यशस्वीपणे हाताळल्याबद्दल गोयल यांचे विशेष कौतुक केले. तसेच ते आता आपले चांगले मित्र बनल्याचेही त्यांनी सांगितले.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हरजिंदर कांग म्हणाले, “आता माझे सर्व भारतीय समकक्षांशी अतिशय चांगले संबंध आहेत. ज्या लोकांशी आम्ही अनेक वर्षे मतभेदांमध्ये अडकलो होतो, त्यांच्यासोबत आता आम्ही नियमितपणे भेटतो, हस्तांदोलन करतो आणि चहावर चर्चा करतो.” ते पुढे म्हणाले, “मंत्री पीयूष गोयल यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे. मी पाहिलेल्या वाटाघाटीकारांमध्ये ते सर्वोत्कृष्ट आहेत. आमच्यासोबतच्या चर्चांसह अनेक मुक्त व्यापार करारांचे नेतृत्व त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केले आहे. आता आम्ही चांगले मित्रही झालो आहोत.”

हरजिंदर कांग यांनी सांगितले की, द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) भारतातील परकीय थेट गुंतवणुकीचा (FDI) ओघ वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कारण यामुळे गुंतवणूकदारांना अधिक विश्वास आणि कायदेशीर संरक्षण मिळेल. “भारत आजही जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक संधींपैकी एक आहे. जागतिक कंपन्या जोखीम आणि परतावा यांचा विचार करून गुंतवणुकीचे निर्णय घेत असल्या, तरी भारताकडे त्या वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत,” असे कांग यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम आणि विकासाच्या संधी या दोन्ही घटकांचे सखोल मूल्यांकन करतात आणि भारत त्यांच्यासाठी मोठ्या वाढीची संधी उपलब्ध करून देत आहे.लंडनमध्ये आयोजित यूके-इंडिया अवॉर्ड्स २०२६ कार्यक्रमाची आठवण सांगताना कांग म्हणाले, “काही दिवसांपूर्वी लंडनमधील ग्लोबल फोरममध्ये पीयूष गोयल यांनी आम्हाला पुरस्कार प्रदान केला. त्यांनी प्रेक्षकांमधून मला उभे राहण्यास सांगितले आणि माझा विशेष उल्लेख करून माझा सन्मान केला. भारतीय व्यवस्थेमध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून सातत्य राखले आहे.”

कराराच्या प्रक्रियेबाबत बोलताना कांग म्हणाले, “भारतीय वंशाचा असल्यामुळे मला भारतीय मानसिकतेची काहीशी कल्पना होती. त्यामुळे या वाटाघाटी कशा असतील याचा अंदाज होता. तरीही हा प्रवास आव्हानात्मक होता.” ते पुढे म्हणाले, “माझ्या मते, भारतीय व्यवस्था व्यवहार आणि परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर आधारित आहे. जर मी तुम्हाला काही दिले, तर बदल्यात काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे आणि त्याउलटही तेच लागू होते. मला वाटते ही भूमिका योग्यच आहे.”

“एकदा तुम्ही या खेळाचे नियम समजून घेतले, की संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी वाटू लागते. सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी माझी जवळीक असल्यामुळे आणि भारताशी माझा सातत्याने संबंध राहिल्यामुळे मला या प्रक्रियेत मोठी मदत झाली,” असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै २०२५ मधील ब्रिटन दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. हा करार १५ जुलैपासून लागू होणार आहे. लंडनमध्ये स्वाक्षरी झालेल्या या ऐतिहासिक करारानुसार, ब्रिटनकडे होणाऱ्या ९०.२ टक्के भारतीय निर्यातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, तर ब्रिटिश उत्पादनांवरील भारताचे आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केले जाईल.यूके-भारत मुक्त व्यापार करार (FTA), ज्याला अधिकृतपणे व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) म्हटले जाते, हा दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी करण्यात आलेला ऐतिहासिक करार आहे. या कराराचा मुख्य उद्देश भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापारात दरवर्षी सुमारे २५.५ अब्ज पौंडांची वाढ करणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande