होर्मुझजवळ इराणी हल्ल्यात पुण्याच्या हेरंब करमरकरांचा मृत्यू
पुणे , 15 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सायप्रसच्या ध्वजाखालील एका व्यापारी जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्यात भारतीय खलाशी हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून जात होते. पुण्यातील रहिवासी असलेल्य
होर्मुझजवळ इराणी हल्ल्यात पुण्याच्या हेरंब करमरकरांचा मृत्यू


पुणे , 15 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सायप्रसच्या ध्वजाखालील एका व्यापारी जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्यात भारतीय खलाशी हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून जात होते.

पुण्यातील रहिवासी असलेल्या मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांनी मृत्यूपूर्वी काही वेळ आधी आपल्या कुटुंबाला एक संदेश पाठवला होता. त्या संदेशात त्यांनी जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. हेरंब यांची ही सागरी मोहीम 3 महिन्यांची होती आणि ते लवकरच भारतात परतणार होते. मात्र हा संदेशच त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला शेवटचा संवाद ठरला.

सायप्रसचा ध्वज असलेल्या मर्चंट जहाज जिएफएक्स गॅलेक्सी वर अनेक भारतीय कर्मचारी कार्यरत असताना या जहाजावर रविवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास इराणने प्रक्षेपकाद्वारे हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांपैकी काही जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हेरंब बेपत्ता होते. मंगळवारी त्यांच्या कंपनीकडून अधिकृतपणे त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील १० भारतीयांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले असून एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.

बुधवारी हेरंब यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. हेरंब यांच्या सासऱ्यांनी सरकारकडे त्यांचा मृतदेह सन्मानपूर्वक आणि सुरक्षित अवस्थेत कुटुंबाच्या ताब्यात देऊन तो भारतात आणण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून व्यापारी जहाजांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये ओमानमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, ते ओमानमधील संबंधित अधिकारी, जहाज व्यवस्थापन आणि इतर संबंधित पक्षांच्या सतत संपर्कात असून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देत आहेत.

यापूर्वी मंगळवारीही होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना इराणने दोन जहाजांवर हल्ला केला होता. त्या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने इराणच्या उपराजदूतांना तलब करून तीव्र निषेध नोंदवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande