
‘मातृत्व विमर्श’ विषयावर विश्वमांगल्य सभेचा विशेष कार्यक्रम
नवी दिल्ली, 15 जुलै (हि.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देशातील मातृशक्तीशी “मातृत्व विमर्श” या विषयावर विस्तृत संवाद साधणार आहेत. आगामी 24 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय आंबेडकर सेंटर येथे विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष कार्यक्रमात देशभरातील सुमारे 700 महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली येथील कॉनस्टिट्यूशन क्लब येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री डॉ. वृषाली जोशी यांनी याबाबत माहिती दिली. आगामी काळासाठी युगानुकूल मातृत्व या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांचा महिलांशी व्यापक संवाद आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.हा कार्यक्रम सुमारे दोन ते अडीच तास चालणार असून, यावेळी डॉ. मोहन भागवत मातृत्व, कुटुंब व्यवस्था, समाजनिर्मिती आणि राष्ट्रजीवनात महिलांची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर आपले विचार मांडतील. कार्यक्रमातील प्रश्नोत्तर सत्र हे विशेष आकर्षण असणार असून, सहभागी महिला सरसंघचालकांशी थेट संवाद साधून आपले प्रश्न आणि विचार मांडू शकतील.
डॉ. वृषाली जोशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात आयोजित होणारा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा आहे. संघाच्या आतापर्यंतच्या पाच सरसंघचालकांच्या कार्यकाळात प्रथमच अशा व्यापक स्वरूपात देशातील प्रबुद्ध मातृशक्तीशी “मातृत्व विमर्श” या विषयावर खुला संवाद होणार आहे.दिल्लीतील आंबेडकर भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमात दिल्लीसह उत्तर भारतातील विविध राज्यांमधून सुमारे 700 ते 800 महिला प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. शिक्षण, सामाजिक सेवा, संस्कृती, साहित्य, वैद्यकीय क्षेत्र, न्यायव्यवस्था, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील प्रबुद्ध महिलांचा यात सहभाग असेल.याच धर्तीवर हैदराबाद येथेही समान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये सुमारे 1,300 प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या संवाद कार्यक्रमांचा उद्देश मातृत्वाची सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भूमिका, कुटुंब व्यवस्था, संस्कार निर्मिती तसेच राष्ट्रनिर्मितीमध्ये महिलांचे योगदान यावर व्यापक चर्चा घडवून आणणे हा आहे.
डॉ. वृषाली जोशी यांनी सांगितले की, हा संवाद समाजातील विविध क्षेत्रांतील महिलांना एकत्र आणून मातृत्वाच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. सध्या विश्वमांगल्य सभेचे कार्य देशातील 33 प्रांतांमध्ये सुरू असून, संस्थेशी 3,500 जबाबदार कार्यकर्ते आणि सुमारे 6 लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. अलीकडेच दिल्लीसह 23 प्रांतांमध्ये महिला अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे 35 हजार महिलांनी सहभाग घेतला. या संवादांच्या आधारे आगामी काळात “युगानुकूल मातृत्व” या विषयावर विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी