
अमरावती, 15 जुलै (हिं.स.) | जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी खरीप हंगामातील पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्याने अवघ्या आठ ते दहा दिवसांत खरीप पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ६६ हजार ६०७ हेक्टर, म्हणजेच ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही कापूस, सोयाबीन आणि तुरीसारख्या पारंपरिक नगदी पिकांना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असून, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मक्याच्या लागवडीतही लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या २०२६-२७च्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यात यंदा ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ५ लाख ६६ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून हे एकूण उद्दिष्टाच्या ८३ टक्के आहे. उर्वरित क्षेत्रावरही पुढील काही दिवसांत पाऊस झाल्यानंतर पेरणी पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.यंदा २ लाख ४५ हजार २४२.५७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. कापसानंतर सोयाबीन हे दुसरे प्रमुख पीक ठरले असून १ लाख ७९ हजार ६९१ हेक्टर क्षेत्रावर त्याची पेरणी झाली आहे.
प्रस्तावित क्षेत्र६,८२,९९२ हेक्टर
पूर्ण पेरणी५,६६,६०७ हेक्टर
टक्केवारी८३ टक्के
पीकनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)
कापूस- २,४५,२४२.५७
सोयाबीन- १,७९,६९१
तूर - ९७,३४६.१२
मका-३५,०८०
धान- ५,७८४.७०
तृणधान्ये- ४२,७६१.५६
कडधान्ये- ९८,१४३.६६
तेलबिया- १,८०,१३९.८०
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी