बंदुकीच्या सावटातून आयआयएमपर्यंत; संघर्षातून स्वप्नांना मिळाली नवी भरारी
गडचिरोली-चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आयआयएमला शैक्षणिक दौरा संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी सांगितली संघर्षाची कहाणी नागपूर, 15 जुलै (हिं.स.) : गोळीबाराचा आवाज, दारुगोळ्याचा वास आणि नक्षलवादी हिंसाचाराच्या भीतीच्या छायेत बालपण व्यतीत
आईआईएम के निदेशक आदिवासी छात्रो से संवाद प्रस्थापित करते हुए


गडचिरोली-चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आयआयएमला शैक्षणिक दौरा

संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी सांगितली संघर्षाची कहाणी

नागपूर, 15 जुलै (हिं.स.) : गोळीबाराचा आवाज, दारुगोळ्याचा वास आणि नक्षलवादी हिंसाचाराच्या भीतीच्या छायेत बालपण व्यतीत केलेले गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 18 आदिवासी विद्यार्थी आता नव्या स्वप्नांसह आणि नव्या आशांसह भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूरमध्ये दाखल झाले. जागतिक दर्जाच्या शैक्षणिक परिसराचा अनुभव घेताना त्यांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने स्पष्टपणे झळकत होती. यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधत स्वतःच्या संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी सांगितली आणि शिक्षणाच्या बळावर आयुष्य घडविण्याचा संदेश दिला.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दीर्घकाळ नक्षलवादी हिंसाचाराने प्रभावित होते. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवाईमुळे या भागातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. जंगलांमध्ये भीतीची जागा आता शिक्षण, विकास आणि स्वावलंबनाच्या नव्या आशेने घेतली आहे. या बदलत्या वातावरणात चंद्रपूर येथील ‘जागृत’ या सामाजिक संस्थेने गडचिरोली आणि चंद्रपूरमधील 12 विद्यार्थी व 6 विद्यार्थिनींसाठी विशेष शैक्षणिक अभ्यासदौऱ्याचे आयोजन केले. या दौऱ्यांतर्गत विद्यार्थ्यांनी आयआयएम नागपूरच्या परिसराला भेट दिली.

भव्य परिसर, आधुनिक शैक्षणिक इमारती, विशाल ग्रंथालय आणि अत्याधुनिक सुविधा पाहून विद्यार्थी भारावून गेले. त्यांच्यासाठी हा केवळ एका संस्थेचा दौरा नव्हता, तर आपल्या स्वप्नांना नवी दिशा देणारा प्रेरणादायी अनुभव होता.

या प्रसंगी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी औपचारिक भाषण न देता कुटुंबप्रमुखाप्रमाणे विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी आपल्या बालपणीच्या संघर्षांचा उल्लेख करत सांगितले की, ते सातारा जिल्ह्यातील जत-आटपाडी परिसरातील एका अतिदुर्गम आणि मागास गावातून आले आहेत. त्यावेळी त्यांच्या गावात उच्च माध्यमिक शाळाही नव्हती. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आणि आज या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, तुमचे आई-वडील अशिक्षित आहेत, ही गोष्ट तुमच्या शिक्षणात कधीच अडथळा ठरू शकत नाही. ध्येय स्पष्ट असेल आणि प्रामाणिकपणे मेहनत केली, तर कोणतीही परिस्थिती यशाचा मार्ग रोखू शकत नाही.

संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने विचारले, जीवनात हार्ड वर्क महत्त्वाचे की स्मार्ट वर्क? त्यावर डॉ. मैत्री यांनी उत्तर दिले, कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही. तुमच्या मेहनतीला जेव्हा यश मिळू लागते, तेव्हाच ती मेहनत आपोआप स्मार्ट वर्कमध्ये रूपांतरित होते.

कार्यक्रमात आयआयएम नागपूरचे प्रा. शैलेन्द्र निगम यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचा विकासप्रवास, अध्यापन पद्धती आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत माहिती दिली. आर्थिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करत ते म्हणाले, आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रतिभा आणि कठोर परिश्रम हीच सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी गुणवत्ता आणि गरजाधारित शिष्यवृत्ती, सरकारी योजना तसेच शैक्षणिक कर्जाच्या सुविधांची माहिती देत विद्यार्थ्यांना, पैशाची चिंता करू नका. फक्त मनापासून अभ्यास करा आणि आपल्या आई-वडिलांचे, गावाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. असे आवाहन केले.

आयआयएम भेटीचा हा अनुभव आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. देशातील एका अग्रगण्य व्यवस्थापन संस्थेचे संचालकही आपल्यासारख्याच प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले आहेत, ही जाणीव त्यांच्या मनात नवा आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करून गेली.

या अभ्यासदौऱ्यात अजय महाका, रंजू मडावी, निलेश मडावी, बाळाजी कलंगा, लक्ष्मी दुर्वे, मोनिका कोटनाके, अजय कोडापे, शंकर कन्नाके, राजू कलंगा आणि चिन्ना महाका यांच्यासह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते. गावाकडे परतताना त्यांच्या सोबत केवळ आयआयएमच्या आठवणी नव्हत्या, तर शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडविण्याचा दृढ संकल्पही होता.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande