
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)। जुलै अर्ध्यावर आलेला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यातील एकूण ५६ प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत ४५.६३ टक्के जलसाठा आहे. मागील सहा दिवसात तो केवळ ६ टक्क्यांनी वाढला आहे. सहा दिवसांपूर्वी ४० टक्के जलसाठा होता.
जिल्ह्यातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण, सात मध्यम प्रकल्प आणि ४८ लघु प्रकल्पांमध्ये मिळून सुमारे ४७७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र हा साठा समाधानकारक नसल्याने आगामी काळात शेती, सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याबाबत चिंता व्यक्त
केली जात आहे. जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज प्रामुख्याने जलसाठ्यावर अवलंबून असते. दरवर्षी जूनपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे प्रकल्प भरून निघतात आणि सिंचनासह पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागतो. मात्र यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवरही होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात सध्या ५१.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणावर सिंचनाबरोबरच औद्योगिक वापर आणि अमरावती शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने साथ दिली नाही, तर पाणीपुरवठ्याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सात मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४०.१२ टक्के, तर ४८ लघु प्रकल्पांमध्ये ३८.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अनेक लघु प्रकल्पांतील पाणीसाठा अत्यल्प असून काही प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्ये पाणीसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यासाठी प्रकल्प परिसरात दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा जिल्ह्याला पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते.
प्रमुख धरणातील सध्याच्या जलसाठा
अप्पर वर्धा - ५१.१८
शहानूर- ३३.४१
चंद्रभागा- ८०.२५
पूर्णा- ७०.४६
सपन- ४१.१७
पंढरी- २९.४९
बोर्डी नाला- ११.७२
गर्गा- 0.00
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी