
रायगड, 17 जुलै (हिं.स.)। : नवी दिल्ली येथे मार्शल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (MGFI) सिरीज-4 आणि द्वितीय लाठी फेडरेशन कप राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 46 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 52 पदकांची कमाई केली. या शानदार यशामुळे राष्ट्रीय स्तरावर रायगडच्या लाठीपटूंचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
स्पर्धेत अवनी पाटील हिने सर्वाधिक 5 सुवर्णपदके पटकावत विशेष चमक दाखवली. श्रीयश संजीत म्हात्रे, मंथन वैभव कदम, वेद वैभव कदम, रुद्रा अंकिता विनय पिंळणकर, पर्णवी स्वप्नील नाईक आणि सई उदय ठाकूर यांनी प्रत्येकी 3 सुवर्णपदके मिळवून संघाच्या यशात मोठा वाटा उचलला. याशिवाय शिवांश पाटील, श्रीअंश वार्डे, हिमांशू म्हात्रे, ऋग्वेद नाईक, आर्य पाटील, प्रेक्षा पाटील, आभा आठवले, आराध्या नखाते, नम्रता चव्हाण यांच्यासह इतर खेळाडूंनीही विविध गटांत पदके जिंकून रायगडचा गौरव वाढविला.
या यशस्वी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच प्रियांका संदेश गुंजाळ, राष्ट्रीय पंच वेदांत संदेश सुर्वे आणि राज्यस्तरीय पंच सिद्धार्थ अशोक पाटील यांचे मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच लाठी असोसिएशन अलिबाग-रायगडचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण मसाल यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
या ऐतिहासिक यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून विजेत्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)