
लंडन, 20 जुलै (हिं.स.)इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना भारत २७ धावांनी हरला. ३८८ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ ३६० धावांवर सर्वबाद झाला. सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने पराभवासाठी गोलंदाजांच्या कामगिरीला जबाबदार धरले. तसेच, रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वृत्तांवरही त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर, जेव्हा शुभमन गिलला रोहित शर्माच्या भविष्याबद्दल आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की संघात यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला याबद्दल बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्याने आम्हाला काहीही सांगितलेले नाही. मला वाटते की हे सर्व माध्यमांमध्ये पसरवले जात आहे. संघात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे तो म्हणाला. गिलने पत्रकार परिषदेतही याच मुद्द्याचा पुनरुच्चार करत सांगितले की, रोहित शर्माने संघातील कोणत्याही सदस्यासोबत आपल्या भविष्याबद्दल चर्चा केलेली नाही.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाल्यास, लॉर्ड्स सामन्याच्या एक दिवस आधी, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले होते की, रोहित शर्मा जसा खेळत आला आहे, तसाच खेळत राहील. दरम्यान, लॉर्ड्स एकदिवसीय सामन्यानंतर शुभमन गिलने सांगितले की, रोहित शर्माने आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये काहीही सांगितले नव्हते आणि हे सर्व नंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. यापलीकडे काहीही नाही.
शुभमन गिलच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, रोहित शर्मा लवकरच कुठेही जाणार नाही. आता, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळताना दिसतील. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पुढील एकदिवसीय मालिका २७ सप्टेंबरला सुरू होत आहे. तोपर्यंत रोहित आणि कोहली विश्रांती घेतील, तर टीम इंडिया यादरम्यान टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळेल. रोहित शर्मा मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार की नाही, हे पाहणे बाकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे