
मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कार्डिफ येथे भारताचा चार विकेट्सने पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता लॉर्ड्स येथे होणारा तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चा सुरू आहे. ती माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीची. विविध माध्यमांतील अहवालांनुसार, लॉर्ड्स येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा रोहित शर्माच्या भारताकडून खेळला जाणारा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय निवड समितीने आतापासूनच नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याची माहिती त्याला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी याबाबत रोहितशी चर्चा केल्याचाही दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रोहित शर्माबाबत अशा चर्चा सुरू होण्यामागे त्याची शारीरिक तंदुरुस्ती हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. गेल्या वर्षभरात त्याने फिटनेसवर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आणि वजनही कमी केले. तरीही दुखापतींनी त्याची साथ सोडलेली नाही. २०२६ च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पाच सामने गमवावे लागले. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीही त्याच्या तंदुरुस्तीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे दीर्घकालीन नियोजन करताना निवडकर्त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
याशिवाय रोहितच्या फलंदाजीतील सातत्यही अलीकडच्या काळात दिसून आलेले नाही. २०२६ मधील एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्येही त्याला मोठी खेळी करता आली नाही. या वर्षातील आठ डावांत त्याने केवळ २४१ धावा केल्या असून त्याची सरासरी ३०.१२ इतकी आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या धावगतीतही घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पूर्वी पॉवरप्लेच्या षटकांमध्ये तो १२० पेक्षा अधिक धावगतीने फलंदाजी करत होता, मात्र आता ही धावगती ९० च्या खाली आली आहे.
रोहितसमोर आणखी एक मोठे आव्हान म्हणजे भारतीय संघातील तरुण खेळाडूंची दमदार स्पर्धा. यशस्वी जैस्वालने सलामीच्या जागेसाठी भक्कम दावेदारी केली असून अवघ्या सहा एकदिवसीय सामन्यांत दोन शतके झळकावत ७० पेक्षा अधिक सरासरी राखली आहे. दुसरीकडे इशान किशननेही पुनरागमन करत आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०९२ धावा आणि एक द्विशतक असून यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून त्याची उपयुक्तता संघासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे भविष्यातील संघबांधणी लक्षात घेता व्यवस्थापन तरुण खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र रोहित शर्मा खरंच लॉर्ड्सनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार की नाही, याचे उत्तर आता अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule