
टोकियो, 17 जुलै (हिं.स.)। भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी वी सिंधूने बीडब्ल्यूएफ जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिची प्रतिस्पर्धी आणि यजमान जपानची माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने सिंधूला वॉकओव्हर मिळाला. या विजयासह सिंधूने 2023 च्या डेन्मार्क ओपननंतर प्रथमच कोणत्याही सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. तसेच, 2026 मधील तिची ही तिसरी उपांत्य फेरी असून, या हंगामातील तिच्या दमदार पुनरागमनाचे हे द्योतक आहे.
हंगामाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेली सिंधू आता पुन्हा अव्वल-10 मध्ये परतली असून सध्या ती जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.
उपांत्य फेरीत चेन यूफेईचे आव्हान
उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावरील चेन यूफेईशी होणार आहे. चेनने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या सिम यू जिनचा 21-10, 21-12 असा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. सिंधू आणि चेन यांच्यात आतापर्यंत 14 सामने झाले असून त्यामध्ये चिनी खेळाडू 8-6 अशा आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, सिंधूला मागील पाचही सामन्यांत चेनकडून सलग पराभव पत्करावा लागला आहे.अशा परिस्थितीत उपांत्य फेरीतील सामना सिंधूसाठी मोठे आव्हान असणार आहे. जर तिने हा सामना जिंकला, तर चेनविरुद्धच्या पराभवाची मालिका संपवण्याबरोबरच जवळपास तीन वर्षांनंतर सुपर 750 स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश मिळवेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule