
वॉशिंग्टन , 17 जुलै (हिं.स.)। फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचा थरार शिगेला पोहोचला आहे. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या या विजेतेपदाच्या लढतीत खेळात सामना पाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थितीही विशेष आकर्षण ठरणार आहे. याची पुष्टी व्हाइट हाऊसने केली असून ट्रम्प रविवारी न्यू जर्सी येथील स्टेडियममध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच ते विजेत्या संघाला विश्वचषक करंडकही प्रदान करणार आहेत.
व्हाइट हाऊसच्या प्रसारमाध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ट्रम्प टॉवरमध्ये फिफाच्या प्रतिनिधींसोबत आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते स्टेडियममध्ये जाऊन विजेतेपदाच्या सामन्याचा आनंद घेतील.
फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी यापूर्वीच सांगितले होते की, ट्रम्प विजेत्या संघाच्या कर्णधाराला विश्वचषक करंडक प्रदान करतील. त्यामुळे मैदानावरील लढतीसोबतच पारितोषिक वितरण सोहळ्याकडेही जगभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
व्हाइट हाऊसच्या माहितीनुसार, विश्वचषक अंतिम सामन्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिकन प्रशासन हा देशातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक मानत असून, त्याच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अर्जेंटिनाने रोमांचक सामन्यात इंग्लंडवर २-१ अशी मात करत जेतेपदाच्या लढतीचे तिकीट मिळवले. आता विश्वविजेतेपदासाठी स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने भिडणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode