अलिबागमध्ये १९ जुलैला जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक जलतरण स्पर्धेचे आयोजन
रायगड, 18 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील जलतरणपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ''नगराध्यक्ष चषक'' जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा रविवार, १९ जुलै रोजी अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात आयोजित करण्
Excitement-surrounds-the-Munic


रायगड, 18 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील जलतरणपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारी 'नगराध्यक्ष चषक' जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा रविवार, १९ जुलै रोजी अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलातील जलतरण तलावात आयोजित करण्यात आली आहे.ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे.

स्पर्धेत ६ वर्षांखालील गटापासून ते १६ वर्षांखालील मुला-मुलींसह खुल्या गटातील महिला व पुरुष जलतरणपटूंना सहभाग घेता येणार आहे. फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चार प्रकारांमध्ये विविध अंतरांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या असून दिवसभर जलतरण तलावात चुरशीच्या स्पर्धा रंगणार आहेत.

स्पर्धकांनी सकाळी ९ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक असून, प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे तसेच प्रत्यक्ष स्पर्धास्थळीही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणी करताना आधार कार्ड किंवा जन्मदाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणी शुल्क आणि स्पर्धेची माहिती सादर करावी लागणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि गटनेते प्रशांत नाईक यांच्या हस्ते होणार असून, मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande