

चालण्यातही एकमेकांना मागे टाकण्यासाठी धडपड
नाशिक, 18 जुलै, (हिं.स.)। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापनादिनानिमित्त घेण्यात आलेल्या वॉकथॉन २०२६ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू केशव मोटे(६० ते ७० वयोगट,सात किलोमिटर विजेते), हरिश्चंद्र थोरात ( ७० ते ८० वयोगट,पाच किलोमिटर विजेते) यांनी तर डॉ.प्रकाश जोशी यांनी ८० वर्षावरील वयोगटातील ३ किलोमिटरमध्ये विजेतेपद पटकावले. ज्येष्ठ नागरिकांच्या या ‘वॉकथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वयाच्या साठीनंतरही निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध दिनचर्येचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.
सकाळी भोसला मिलिटरी स्कूलजवळील शहीद स्मारकांच्या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे राष्ट्रीय विपनन विभाग प्रमुख विनय खानोलकर, प्रसिध्द मेंदू विकास तज्ञ डॉ.महेश करंदीकर,राहुल तारगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे,सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे,नाशिक विभागाचे उपाध्यक्ष डॉ.मनोहर शिंदे, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.विजयप्रसाद अवस्थी, आनंद देशपांडे, अजित भांदक्कर आदी उपस्थित होते. सुरवातीला तीन किलोमिटरचा जेष्ठ नागरीकांचा गट सोडण्यात आला. त्यानंतर ठराविक वेळाने पाच आणि सात किलोमिटरच्या गटाला सोडण्यात आले.
अल्हाददायक वातावरण अन् मागे टाकण्याची जणू स्पर्धांच
पहाटेच्या आल्हाददायक, प्रसन्न वातावरणात पावसानेही जणू विश्रांती घेतली होती. हिरवागार परिसर, थंडगार वारा आणि टाळ्यांच्या गजरात ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यांवर उत्साहाची झळाळी खुलून दिसत होती. वयाच्या साठी, सत्तरी आणि ऐंशीचा टप्पा ओलांडल्यानंतरही आम्ही अजूनही चिरतरुण आहोत हेच जणू आपल्या प्रत्येक पावलातून सिद्ध करण्याची स्पर्धकांची धडपड सुरू होती. चालण्याची स्पर्धा असली तरी प्रत्येक पाऊल विजेतेपदाच्या दिशेने झेपावत होते. स्वतःचा तोल सांभाळत, नियमित सरावाचा कस दाखवत आणि एकमेकांना मागे टाकण्याच्या निरागस प्रयत्नात ज्येष्ठांचा दांडगा आत्मविश्वास व जिद्द प्रत्येक क्षणी जाणवत होती. मार्गाच्या दुतर्फा उपस्थित नागरिकांच्या टाळ्या आणि उत्साहवर्धक घोषणांनी स्पर्धकांचा जोश अधिकच वाढविला. आरोग्य, शिस्त, इच्छाशक्ती आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा प्रेरणादायी संगम घडविणारा भोंसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा 'वॉकथॉन' अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. ही स्पर्धा धावण्याची नसून चालण्याची असल्याने प्रत्येक स्पर्धकाने स्वतःचा वेग, नियमित सराव आणि अनुभव यांच्या बळावर स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विजेत्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे, आनंद देशपांडे, विकास समितीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी ,आनंद देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ प्रशिक्षक व क्रीडा संघटक प्रा. नितीन अहिरराव, नारायण गायधनी,समन्वयक संतोष जगताप तसेच क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. क्रीडासंचालक केतन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. समारोपप्रसंगी कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी आभार मानले.
चौकट
स्पर्धा निकाल असा(प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमाने)
तीन किलोमिटर पुरुष- (कंसात नोंदवलेली वेळ)- डॉ.प्रकाश जोशी (३६ मिनिटे), काशिनाथ देसाई(३९ मि.), सुभाष कोपरगावकर(४१ मि),
महिला-सुहासिनी साठे(४४ मि.) शैलेजा शिंत्रे(४९ मि.),सुमन चौधरी(५७ मि.)
५ किलोमिटर पुरुष- हरिश्चंद्र थोरात(४८ मि.), अशोक कोकाटे(४९ मि.), सोपान गुरुळे(५१ मी.)
महिला-शैलेजा जैन, मंगला कुलकर्णी,प्रज्ञा गोखले
७ किलोमिटर पुरुष-केशव मोटे(४७ मि.), रविंद्र पाटील(४९मि.),एन.एम.कासार(५२मि)
महिला- अंजली कुलकर्णी(६५ मि.)आनंदी पटेल(६७मि.),शरयु वाघ(६८मि.)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV