
नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी, रविवारी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
एका विशेष मुलाखतीत देवजीत सैकिया म्हणाले, माध्यमांमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. मी पूर्ण खात्रीने सांगू इच्छितो की, रविवारी लॉर्ड्सवर रोहित आपला शेवटचा सामना खेळेल अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. रोहित भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो संघाच्या योजनांचा भाग राहील, तोपर्यंत तो देशाचे प्रतिनिधित्व करत राहील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना त्याचा शेवटचा सामना नसेल.
गेल्या काही दिवसांत, अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष ठेवून भारतीय निवड समितीला युवा क्रिकेटपटूंवर लक्ष केंद्रित करायचे होते. परिणामी, रोहित शर्माच्या भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले. त्याच्या अलीकडील कामगिरीनेही या चर्चांना आणखी खतपाणी घातले. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितने अनुक्रमे केवळ ११ आणि २६ धावा केल्या. पण, रोहित शर्माने आधीच जाहीर केले आहे की २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतासाठी खेळणे हे त्याचे ध्येय आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारताने पहिला सामना जिंकला, तर इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करून मालिका बरोबरीत आणली. रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याने मालिकेचा विजेता निश्चित होईल. या सामन्यापूर्वी बीसीसीआय सचिवांनी दिलेल्या एका निवेदनामुळे रोहित शर्माच्या भविष्याबद्दलच्या सर्व चर्चांना सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कामगिरी देखील चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने आपल्या शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४१ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ३०.१ आणि स्ट्राइक रेट ८८.६ असून, त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. कार्डिफमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने ४७ चेंडूंमध्ये केवळ २६ धावा केल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे