
नवी दिल्ली, 18 जुलै, (हिं.स.) - क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाणारे वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गार्फिल्ड सोबर्स यांच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सचिनने सोबर्ससोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला, तर कोहली म्हणाला की सोबर्सने आपल्या कारकिर्दीत जे काही मिळवले ते येणाऱ्या पिढ्या स्मरणात ठेवतील. सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी फलंदाजी, वेगवान आणि फिरकी गोलंदाजी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने क्रिकेटला एक नवी ओळख दिली.
सचिन तेंडुलकरने सर गॅरी सोबर्ससोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देणारी एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली. सचिन म्हणाला की या बातमीवर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. आपल्या आठवणी सांगताना सचिनने लिहिले, सर गॅरी आता आपल्यात नाहीत हे स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र घालवलेल्या आठवणी मला आठवत आहेत, ज्यात २००३ च्या विश्वचषकात त्यांनी मला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ट्रॉफी प्रदान केली होती आणि त्यांनी माझ्याबद्दल वापरलेले प्रेमळ शब्दही आहेत. ते नेहमीच अविश्वसनीयपणे दयाळू आणि उदार होते.
लंडनमध्ये सोबर्स यांच्याबरोबर झालेल्या आपल्या शेवटच्या भेटीची आठवण काढताना सचिन म्हणाला, काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये आपण भेटलो तो क्षण माझं मन पुन्हा पुन्हा अनुभवतं. आम्ही फक्त बसून क्रिकेटबद्दल बोलत होतो. ती आपली शेवटची भेट होती, हा विचारच खूप दुःखद आहे. ते खरोखरच 'एकमेव' होते. त्यांची आठवण कायमच येत राहील. सर गॅरी, तुमच्या आत्म्यास शांती लाभो.
भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीनेही सर गार्फिल्ड सोबर्स यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्याने सोबर्स यांचे वर्णन क्रिकेट इतिहासातील महान व्यक्तींपैकी एक असे केले. कोहलीने लिहिले की, क्रिकेटने आपला एक महान क्रिकेटपटू गमावला आहे. सर गार्फिल्ड सोबर्स, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुमचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही आपल्या खास शैलीत त्यांची आठवण काढली. त्यांनी लिहिले, अष्टपैलू ही संज्ञा क्रिकेटपटूंसाठी वापरली जाते. ही संज्ञा सर गार्फिल्ड सोबर्स यांच्यासाठी तयार करण्यात आली होती. वेगवान गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, सुंदर डावखुरी फलंदाजी, एका षटकात सहा षटकार, ३६५ धावांवर नाबाद, तेही वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी. ते त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. जर ते आयपीएलच्या काळात असते, तर निःसंशयपणे ते सर्वात महागडे क्रिकेटपटू ठरले असते. क्रिकेटने आपला एक सर्वात परिपूर्ण खेळाडू गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि जगभरातील हितचिंतकांना माझ्या संवेदना.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे