मुलांनी ज्ञानसंपन्न होण्याचा संकल्प करणे गरजेचे - ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर
- आगाशे विद्यामंदिरात तिसरीच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा संकल्पदिन रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा संकल्पदिन उत्साहात साजरा झाला. उद्याचे जबाबदार नाग
आगाशे विद्यामंदिरातील संकल्पदिनी बोलताना प्रमोद कोनकर शेजारी मुख्याध्यापिका प्राजक्त कदम प्रबंधक विनायक हातखंबकर


- आगाशे विद्यामंदिरात तिसरीच्या विद्यार्थ्यांचा आगळावेगळा संकल्पदिन

रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा संकल्पदिन उत्साहात साजरा झाला.

उद्याचे जबाबदार नागरिक घडवायचे असतील, तर लहान वयातच त्यांना योग्य ध्येयांची दिशा मिळायला हवी. तसेच त्या दिशेने जाण्याचा दृढ संकल्प केल्यास त्यांची वाटचाल सुकर होते. म्हणून संकल्पाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसण्याकरिता दर वर्षीप्रमाणे यंदाही तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता संकल्पदिन साजरा करण्यात आला. या वेळी आचार्य म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमधून संकल्पाचे महत्त्व सांगितले आणि जिज्ञासू वृत्ती जपणे महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन केले.

मुलांनी आपल्याला पडणारे प्रश्न पालकांना, शिक्षकांना विचारले पाहिजेत. वाचन केले पाहिजे. जिज्ञासू वृत्ती जपली पाहिजे. केवळ पहिले येण्याचे किंवा स्पर्धेत जिंकण्याचेच उद्दिष्ट ठेवून तयारी करण्यापेक्षा आपण ज्ञानसंपन्न होण्याचा संकल्प करणे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री. कोनकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ससा-कासवाच्या गोष्टीची दुसरी बाजू सांगताना, कासवाच्या विजयामध्ये त्याने सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या केलेल्या संकल्पाचा वाटा मोठा असल्याचे ते म्हणाले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या बालपणीची गोष्टही कोनकर यांनी सांगितली. न्या. रानडे शाळेत असताना सातवीत जिल्ह्यात पहिले आले होते. त्या दिवशी ते शाळेतून घरीच आले नाहीत असे वाटल्याने आई त्यांना शोधत होती. तेव्हा ते घराच्या माळ्यावर अभ्यास करताना आढळले होते. यशात सातत्य राहण्यासाठी पुढच्या वर्षीचा अभ्यास सुट्टीच्या एका महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प केल्याचे तेव्हा त्यांनी आईला सांगितले होते. भविष्यात ते महान होण्यामध्ये त्यांच्या जीवनातील हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विशद करतानाच कोनकर यांनी विद्यार्थ्यांना असेच दृढ संकल्प करण्यास सांगितले.

तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी शारदास्तवन म्हटले, आचार्यपूजन केले, तसेच श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे १० श्लोक आणि संकल्पगीतही म्हटले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी संकल्प दिनाची संकल्पना स्पष्ट केली. पहिली-दुसरीची मुले खूपच लहान असतात; मात्र तिसरीतील मुलांना थोडी समज आलेली असते आणि त्या वयोगटातील मुलांचा मेंदू अत्यंत संस्कारक्षम असतो. त्यामुळे या वयातच त्यांना संकल्पाचे महत्त्व सांगून, जीवनात यशस्वी होण्याकरिता त्यांच्याकडून चांगल्या गोष्टींचे संकल्प करून घेतले, तर त्याचा चांगला प्रभाव पडत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच तिसरीच्या मुलांसाठीच संकल्पदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. चौथीनंतर विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडतात. तोपर्यंत त्यांच्याकडून शाळेत या संकल्पांचा पाठपुरावा करून चांगल्या सवयी त्यांच्या अंगी बाणवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात, असे सौ. कदम यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande