भारतात १५ जुलैपर्यंत डोपिंगची ७८ प्रकरणे; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.) । केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना खुलासा केला की, यावर्षी १५ जुलैपर्यंत भारतात डोपिंगची ७८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी १३
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.) । केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना खुलासा केला की, यावर्षी १५ जुलैपर्यंत भारतात डोपिंगची ७८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी १३ प्रकरणांसह सर्वाधिक प्रकरणे आहेत. भाजप खासदार संबित पात्रा यांनी गेल्या तीन वर्षांत प्रतिबंधित पदार्थांसाठी पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंच्या संख्येबद्दल विचारले होते, ज्यावर मांडविया यांनी लेखी उत्तरात सांगितले की, २०२६ मध्ये डोपिंगची ७८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

मांडविया म्हणाले, राष्ट्रीय डोपिंग विरोधी नियम २०२१ अंतर्गत या खेळाडूंवर क्रीडा उपक्रमांमधून बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर मध्य प्रदेशात ११ प्रकरणे आहेत. या यादीत कर्नाटक नऊ प्रकरणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये भारतात डोपिंगची २१३ प्रकरणे नोंदवली गेली, जी २०२४ मध्ये वाढून २६० झाली. त्यानंतर २०२५ मध्ये ही संख्या १३१ पर्यंत कमी झाली.

अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि सिक्कीम येथील एकही खेळाडू डोपिंगसाठी दोषी आढळला नाही. क्रीडा मंत्र्यांनी सांगितले की, डोपिंगचा सामना करण्यासाठी सरकारने खेळाडूंमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि परिसंवाद व कार्यशाळा आयोजित करणे यासह अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande