
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) :भारतामध्ये डेंग्यू प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) ‘डेंग्यू टेट्राव्हॅलंट व्हॅक्सीन (लाइव्ह, अटेन्युएटेड) – Qdenga’ या लसीच्या विपणन प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. देशात डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी मंजूर झालेली ही पहिलीच लस ठरली आहे.
ही लस जर्मनीच्या कंपनीने विकसित केली असून, मेसर्स ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमार्फत भारतात आयात केली जाणार आहे.
औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 तसेच औषध नियम, 1945 मधील तरतुदींनुसार लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे सविस्तर वैज्ञानिक मूल्यमापन केल्यानंतर ही मंजुरी देण्यात आली आहे.
लसीची वैशिष्ट्ये
Qdenga ही रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञानावर आधारित लाइव्ह, अटेन्युएटेड टेट्राव्हॅलंट डेंग्यू लस आहे. ही लस ‘वेरो पेशी’ (Vero cells) मध्ये तयार केली जाते. यामध्ये डेंग्यू विषाणूच्या विविध सिरोटाइपशी संबंधित जनुकीय घटकांचा समावेश आहे.
ही लस फ्रीझ-ड्राइड पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असून, त्यापासून तयार केलेले द्रावण त्वचेखाली टोचले जाते. 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी या लसीचा वापर करण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार 0.5 मिलीचे दोन डोस तीन महिन्यांच्या अंतराने दिले जातील.
जागतिक क्लिनिकल अभ्यासातून सुरक्षितता सिद्ध
या लसीला मंजुरी देताना डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या तसेच नसलेल्या देशांमध्ये करण्यात आलेल्या व्यापक जागतिक क्लिनिकल अभ्यासातील निष्कर्षांचा आधार घेण्यात आला आहे.
ब्राझील, थायलंड, श्रीलंका यांसह आठपेक्षा अधिक देशांतील नागरिकांवर या लसीच्या सुरक्षितता, रोगप्रतिकारशक्ती आणि परिणामकारकतेचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये 4 ते 60 वर्षे वयोगटातील भारतीय लोकसंख्येवर करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील सुरक्षितता आणि रोगप्रतिकारशक्ती अभ्यासाचाही समावेश आहे.
Qdenga लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड यांसह 42 देशांमध्ये नियामक मंजुरी मिळाली आहे. तसेच या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) पूर्वपात्रताही प्राप्त झाली आहे.
जागतिक स्तरावर या लसीचे 24 दशलक्षांहून अधिक डोस वितरित करण्यात आले असून, वापरानंतरच्या निरीक्षणांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. गंभीर सुरक्षितता चिंतेची कोणतीही बाब आढळून आलेली नाही.
भारतातील पहिल्या डेंग्यू लसीला मिळालेली मंजुरी ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डास नियंत्रण, रोग देखरेख, लवकर निदान आणि रुग्ण व्यवस्थापन उपायांना यामुळे अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विज्ञानाधारित नियामक प्रक्रियेद्वारे सुरक्षित, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण लसी व औषधे नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपली बांधिलकी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule