
पुणे, 20 जुलै (हिं.स.) । पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १७.२६ टीएमसी, म्हणजेच सुमारे ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.६१ टीएमसीने कमी असल्याने आगामी काळात पाणी नियोजनाचे आव्हान कायम आहे.यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक अत्यल्प होती. मात्र, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आणि साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला.खडकवासला प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे २९ टीएमसी आहे. दरवर्षी जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. यंदा मात्र साठा वाढला असला तरी तो अद्याप मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज, उन्हाळ्यातील बाष्पीभवन आणि शेतीसाठी आवश्यक पाणी यांचा विचार करून पुढील काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु