पिंपरी-चिंचवडमध्ये क्षेत्रीय समित्यांसाठी ३० स्वीकृत सदस्यांची निवड; भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी
पिंपरी, 20 जुलै (हिं.स.) । पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने महापालिकेचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यात आली आहे. या नव्या क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज १ जुलैपासून सुरू
PCMC


पिंपरी, 20 जुलै (हिं.स.) । पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने महापालिकेचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यात आली आहे.

या नव्या क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज १ जुलैपासून सुरू झाले असून, १३ जुलै रोजी क्षेत्रीय समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष क्षेत्रीय समित्यांवरील स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लागले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी तीन सदस्य याप्रमाणे एकूण ३० स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांकडून आता क्षेत्रीय सदस्यपदासाठी नेत्यांकडे पाठपुरावा केला जात आहे. ‘स्वीकृत नगरसेवकपद मिळाले नाही, तरी किमान क्षेत्रीय समिती सदस्यपदाची संधी द्यावी,’ अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

पुनर्रचनेनंतर शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालये आणि त्यांच्या अध्यक्षपदांवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे या समित्यांवरील सदस्यपदासाठी आमदार, शहराध्यक्ष, महापौर आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे इच्छुकांनी संपर्क वाढवला आहे.महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले की, “दहा क्षेत्रीय कार्यालये अस्तित्वात आली असून अध्यक्ष निवडीनंतर आता स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया लवकरच राबवली जाईल. ही प्रक्रिया संबंधित क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पार पडेल. प्रत्येक कार्यालयासाठी तीन याप्रमाणे एकूण ३० सदस्यांची निवड केली जाईल. उमेदवार हा सामाजिक कार्यकर्ता तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande