
छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)। देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर यांच्या संचालक मंडळासाठी आयोजित करण्यात आलेला प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी संचालकांची जबाबदारी, सुशासनाचे महत्त्व आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये संचालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या बँकिंग क्षेत्रात संचालकांनी सातत्याने ज्ञानवृद्धी करून प्रभावी नेतृत्व करण्याची गरज व्यक्त केली.
हिंगोली बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये संचालकांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन करताना प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी आणि आधुनिक बँकिंग व्यवस्थेतील संचालकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. बँकिंग तज्ज्ञ जयंत अभ्यंकर यांनी एनपीए व्यवस्थापन या विषयावर थकीत कर्ज नियंत्रण, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक शिस्त याबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर आणि रूपेंद्र कोयळकर यांनी कर्ज प्रक्रिया, ऑडिट (तपासणी), कम्प्लायन्स (अनुपालन) आणि ताळेबंद विश्लेषण या विषयांवर मार्गदर्शन केले. केशव स्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील यांनी सेवाकार्य, सामाजिक बांधिलकी आणि बँकेच्या सेवा प्रकल्पांतील सहभाग यावर प्रेरणादायी विचार मांडले.
समारोपप्रसंगी अध्यक्ष किशोर शितोळे यांनी संचालकांनी बँकिंग विषयांचा नियमित अभ्यास करून सक्रिय नेतृत्व करावे, बँकेच्या व्यवसायवृद्धीसोबत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे तसेच सर्व संचालक व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्ञान, सुशासन, पारदर्शकता आणि सेवाभाव यांच्या आधारे देवगिरी नागरी सहकारी बँक अधिक सक्षम व समाजाभिमुख वाटचाल करत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis