
लंडन, 20 जुलै (हिं.स.)रोहित शर्माच्या शानदार शतकानंतरही, इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला २७ धावांनी पराभूत केले. अशाप्रकारे, इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. यापूर्वी इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला पराभूत केले होते आणि आता एकदिवसीय मालिकेतही आपले वर्चस्व सिद्ध केले. इंग्लंडने २०१९ नंतर प्रथमच भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडने ५० षटकांत तीन गडी गमावून ३८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ निर्धारित षटकांत सात गडी गमावून केवळ ३६० धावाच करू शकला. भारतासाठी रोहित शर्माने शानदार शतक झळकावले, तर शुभमन गिल आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. लक्ष्य इतके मोठे होते की, तीन फलंदाजांच्या शानदार खेळीनंतरही भारतीय संघ सामना जिंकू शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहित आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. या दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यांमधील ही भारताची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. मात्र, गिल ७७ धावा करून आपली विकेट गमावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रोहितने विराट कोहलीसोबत मिळून डाव सावरला. वेगवान गतीने खेळत रोहितने अवघ्या ८४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा रोहित हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने वयाच्या ३९ वर्षे आणि ८० दिवसांनी हा पराक्रम केला. इतकेच नाही, तर सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा रोहित हा सर्वात वयस्कर फलंदाज आहे. मात्र, जेकब बेथेलने रोहितला बाद केले. रोहितने ११० चेंडूंमध्ये १७ चौकार आणि पाच षटकारांसह १३८ धावा केल्या होत्या.
गिल आणि रोहितने भारताला भक्कम सुरुवात करून दिली आणि पहिली विकेट पडल्यानंतर, कोहलीने रोहितसोबत डाव सांभाळला. रोहित आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली, जी बेथेलने तोडली. मात्र, कोहलीने चिकाटी दाखवत आपले अर्धशतक पूर्ण केले. लॉर्ड्सवरील कोहलीचे हे पहिले अर्धशतक होते. भारताला तिसरा धक्का ईशान किशनच्या रूपाने बसला, जो १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेचच श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. कोहलीने डाव सांभाळल्यामुळे भारताच्या आशा जिवंत होत्या. मात्र, सॅम करनने विराट कोहलीला बाद करून भारताला पाचवा धक्का दिल्ला. कोहली ६० चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांसह ७४ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताने सामना गमावला कारण केएल राहुल आणि अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाले. इंग्लंडकडून करनने चार बळी घेतले, तर आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि जेकब बेथेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे