दिल्ली लाठीचार्ज प्रकरणी अभिजीत दिपके यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतरमंतर परिसरात झालेल्या आंदोलनानंतर काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनादरम्यान विद
Abhijit Dipke Delhi lathi charge incident


नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतरमंतर परिसरात झालेल्या आंदोलनानंतर काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थी, तरुण आणि अल्पवयीन मुलींवर अमानुष लाठीमार करण्यात आल्याचा दावा केला. या कारवाईत सुमारे १५० विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगत त्यांनी अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे म्हटले.

दिपके यांनी आरोप केला की, आंदोलनात सहभागी झालेल्या १२ वर्षांच्या मुलीचे डोके फोडण्यात आले, तर १५ ते १६ वर्षांच्या मुलींच्या गळ्यावर काठ्यांनी वार करण्यात आले. एका मुलीला पोलिसांनी मारहाण करताना तिचे कपडे फाडले आणि छातीवर पाय देऊन मारहाण केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी तिचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकार जबाबदार असतील, असे म्हटले.

आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याचे फवारे वापरण्याऐवजी पोलिसांनी थेट लाठीमार केल्याचा आरोप करत दिपके यांनी ही कारवाई पूर्वनियोजित असल्याचा दावा केला. जंतरमंतर परिसरात प्रत्येकाची तपासणी होत असताना दगडांनी भरलेले ट्रक आत कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच काही जण नागरी पोशाखात पोलिसांसोबत मारहाण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिपके यांनी सांगितले की, सरकारने चर्चेच्या नावाखाली त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे भ्रमणध्वनी जप्त केले आणि त्यांना अनेक तास एका ठिकाणी थांबवून ठेवले. त्यामुळे आंदोलनाच्या नेतृत्वात गोंधळ निर्माण करण्याचा आणि त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. यापुढे सरकारशी चर्चा करण्यासाठी आपण जाणार नसून, सरकारनेच जंतरमंतर येथे येऊन चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्यावरही पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप केला. आंदोलनातील घटनांमुळे सोनम वांगचुक यांनी पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देत, त्यांची प्रकृती लक्षात घेता हा निर्णय दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत दिल्ली पोलिस किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande