मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून काय साध्य करायचे होते? घातपाताचा कट होता का? – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, 22 जुलै (हिं.स.) : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. ज्या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, त्या ठिकाण
एकनाथ शिंदे


मुंबई, 22 जुलै (हिं.स.) : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. ज्या ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, त्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते? पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाबत काही घातपाताचा कट होता का? देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? असा थेट सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांच्यावर मोठी घटनात्मक जबाबदारी आहे. अशा पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून चुकीचा पायंडा पाडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. जिथे कोणालाही आंदोलन करता येत नाही, त्या ठिकाणी लोकांना बोलावणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा प्रयत्न होता, असेही ते म्हणाले.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना दुर्दैवी असल्याचे मान्य करत, केंद्र सरकारने त्यानंतर तातडीने कठोर पावले उचलल्याचे शिंदे यांनी सांगितले. नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि काटेकोरपणे घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे २० ते २२ लाख विद्यार्थी बसले, त्यापैकी जवळपास ११ लाख विद्यार्थी पात्र ठरले. त्यानंतर जेईई आणि सीयूईटी (कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षाही सुरळीत पार पडल्या. या तीन प्रमुख परीक्षांमध्ये मिळून ४० ते ५० लाख विद्यार्थी सहभागी झाले, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने स्वतः या प्रक्रियेकडे लक्ष देत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले, मात्र विरोधकांनी त्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही शिंदे यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande